News Updates

आवाजातूनच आपली ओळख निर्माण होते – अमीर तडवळकर

सोलापूर - प्रत्येक व्यक्तीचा आवाज हीच त्या व्यक्तीची ओळख असते. आवाजामुळेच चित्रपटाच्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग यश मिळवणारे अमिताभ बच्चन, गायनाच्या क्षेत्रात लता मंगेशकर उत्तुंग यश मिळाले. मात्र अपयशाची पर्वा न करता केलेल्या परिश्रमामुळेच त्यांना यश मिळाले. हाच मूलमंत्र अंगी बानवा असे आवाहन आवाजाच्या क्षेत्रातील जादूगार म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात कलावंत अमीर तळवळकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठात सुरू असलेल्या आवाजाच्या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख व शिबिर संयोजक डॉ. रवींद्र चिंचोलकर ,प्रा. तेजस्विनी कांबळे, नितीन शिंदे यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेत पुढे बोलताना तडवळकर यांनी सांगितले की मी जेव्हा करिअर करण्यासाठी मुंबईत गेलो तेव्हा अनेकांनी तू इथे आलास कशाला? तुला यश मिळणार नाही ?असे म्ह्णून मला नाऊमेद केले . मात्र ध्येय निश्चित असल्याने मी खचलो नाही. चार वर्षै खूप अडचणीची ठरली पण जो अपमान पचवू शकतो तोच मोठा होऊ शकतो ही बाब मनाशी बाळगून मी काम करत गेलो. त्यामुळे आज मला जगभरातून कामे मिळत आहेत. डिस्नेच्या कार्टूनव्दारे 48 देशात माझा आवाज पोहोचतो आहे. आवाजाच्या क्षेत्रांमध्ये कार्य करू इच्छिणाऱ्यांनी दररोज सराव केला पाहिजे, ओंकार, अथर्वशीर्षाचे पठण नियमितपणे केले पाहिजे. डोनाल्ड डक साठी मी मागील सहा वर्षापासून आवाज देतो आहे असे सांगून तडवळकर म्हणाले की या या प्रकारच्या आवाजावर प्रभुत्व निर्माण करण्यासाठी मला खूप सराव करावा लागला. मात्र त्यामुळेच आजही दुसरी कोणतीही व्यक्ती स्पर्धक म्हणून निर्माण होऊ शकलेली नाही. आवाजाच्या क्षेत्रात तसेच मास कम्युनिकेशन च्या क्षेत्रात करिअरच्या खूप संधी आहेत, मात्र त्यासाठी ध्यासपूर्वक शिक्षण घेण्याची, सराव करण्याची गरज आहे असेही तडवळकर म्हणाले. याप्रसंगी तडवळकर यांनी अनेक प्रात्यक्षिके दाखवली. आवाजामध्ये कसे बदल करावेत, आवाजाची पातळी खाली किंवा वर कशी न्यावी, कोणत्या वेळी कशा प्रकारचा आवाज वापरावा यासंदर्भात अनेक उदाहरने त्यांनी दिली. तब्बल साडेतीन तास रंगलेल्या या आवाजाच्या जादुई दुनियेत सारे विदयार्थी रंगून गेले होते. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठात सुरु असलेल्या आवाजाच्या कार्यशाळेत सहा फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात ‘भाषण कला’ या विषयावर सचिन वायकुळे यांचे व्याख्यान झाले. दुपारच्या सत्रात ‘दूरचित्रवाणी साठी निवेदन कला ‘ या विषयावर अपर्णा गव्हाणे यांचे व्याख्यान झाले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध ठिकाणचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

Related News