News Updates

प्रत्येकाने आपल्या जीवनातून प्लास्टिकला हद्दपार करावे

सोलापूर - प्रत्येकाने आपल्या जीवनातून प्लास्टिकला हद्दपार केले पाहिजे, तरच प्लास्टिकच्या संकटापासून आपली सुटका होऊ शकते असे मत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले. किर्लोस्कर - वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.

विदयापीठाच्या सभागृहात दिनांक 19 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी दोन वाजता पार पडलेल्या या उद्घाटन समारंभात मंचावर प्रमुख अतिथी विनोद बोधनकर, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजचे हेड एस.एल. कुलकर्णी व एच.आर. मॅनेजर विलास खरात, किर्लोस्कर- वसुंधरा महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव,  विदयापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर हे उपस्थित होते

याप्रसंगी पुढे बोलताना कुलगुरू डॉ .फडणवीस म्हणाल्या की प्लास्टिकमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे निसर्गाचे चक्र बदलते आहे. रस्ते तयार करण्याच्या कामात प्लास्टिकचा वापर करणे यासारखे काही पर्याय शोधले जातात मात्र यापेक्षाही सर्वात खरा पर्याय हा प्लास्टिकचा वापर न करणे हाच आहे. या दृष्टीने विदयापीठातील देखील सर्व विदयार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर करणे कटाक्षाने टाळायला हवे असे आवाहन त्यांनी केले. प्लास्टिकचे आरोग्यावरही दुष्परिणाम होतात यासंदर्भात अनेक अभ्यास पुढे आले आहेत.  विदयापीठांमध्ये देखील या दृष्टीने असा आरोग्यविषयक जागृती चा उपक्रम देखील हाती घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी विनोद बोधनकर यांनी सांगितले की जगभरातील सात समुद्रांमध्ये साठलेल्या प्लास्टीकमुळे जगाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे मासे व पक्षी नष्ट होतात.25% माशांच्या पोटामध्ये आता प्लास्टिक साठले आहे, त्यामुळे मासे मरण पावत आहेत, त्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत.  समुद्रातून मिळणारा  ऑक्सिजन प्लास्टीकच्या समस्येमुळे  कमी व्हायला लागलेला आहे. अशा परिस्थितीत केवळ एका देशाचा विचार करून चालणार नाही तर जगातील 170 देशांनी एकत्रित येऊन काम करायला हवे. या कार्यात शाळेच्या विदयार्थ्यांनी पुढाकार घेऊन प्लास्टिकला नकार देण्याचा उपक्रम हाती घेतल्याने मोठा फरक दिसतो आहे.

पुण्यात सागरमित्र संस्थेतर्फे केवळ 150 शालेय विदयार्थ्यांना हाती घेऊन आम्ही प्लास्टीकचा कचरा  घरातून आणून जमा करण्याचा एक प्रकल्प 2013 साली सुरू केला त्यात आता 2 लाख मुले सहभागी झाली आहेत. अशा उपक्रमासाठी अमेरिकेतून देखील आम्हाला निमंत्रण आले. या प्लास्टीकवर प्रक्रीया केली जाते. आता महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यास शासनाने परवानगी दिली आहे. या प्रकल्पात विद्यार्थ्यांची साथ महत्त्वाची ठरली असल्याचे विनोद बोधनकर यांनी याप्रसंगी सांगितले

कार्यक्रमाच्या प्रारंभी मंचावरील कुलगुरु डॉ. फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी देऊन या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविकात सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पर्यावरण विषयक या महोत्सवात सातत्याने महत्त्वाचे योगदान दिले आहे. भारताच्या पंतप्रधानांनी प्लास्टिकच्या प्रदूषणाविरोधात देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आणि सोलापूरकरांनी देखील यात सहभागी होऊन प्लास्टिकला हद्दपार करावे असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंबादास भासके यांनी केले डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विद्यापीठातील विविध संकुलातील विद्यार्थी अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते

चौकट

पर्यावरणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल याप्रसंगी सागरमित्र संस्थेचे संस्थापक विनोद बोधनकर यांचा कुलगुरु डॉ. फडणवीस यांच्या हस्ते वसुंधरा मित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.  या प्रसंगी त्यांच्या मानपत्राचे वाचन ऋषिकेश कुलकर्णी यांनी केले

किर्लोस्कर वसुंधरा महत्त्वाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या लघुपट आणि माहितीपट स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यात पहिले पारितोषिक पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग, सामाजिक शास्त्रे संकुलातील  भैरव भुसारे याला मिळाला. व्दितीय पुरस्कार सोशल महाविद्यालय सोलापूरच्या प्रतीक कांबळे आणि दाऊद कुरेशी यांच्या माहितीपटाला मिळाला तर तृतीय पुरस्कार विद्यापीठातील अर्थशास्त्र संकुलातील केदार मलादे या विद्यार्थ्यांने तयार केलेल्या लघुपटाला मिळाला. या सर्व विजेत्यांना कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले  ्या स्प्र्धेचे परीक्षण पार्यवरणतज्ञ निनाद शहा व चित्रपट दिग्दर्शक संदीप जाधव यांनी केले.

Related News