News Updates

पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमातून  प्रशिक्षित विदयार्थी घडावेत

सोलापूर- पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयातील बी. होक. या पदवी अभ्यासक्रमातून चांगले प्रशिक्षित विदयार्थी घडावेत या उद्देशाने विदयापीठाने सामाजिक शास्त्रे संकुलात हा अभ्यासक्रम सुरु केला आहे असे मत कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात बी. होक. पत्रकारिता व जनसंज्ञापन या पदवी स्तरावरील अभ्यासक्रमाचे उदघाटन    शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता  करताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमप्रसंगी संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे , मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॉ माया पाटील, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश व्हनकडे,  कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्यासह विविध अध्यापक , विदयार्थी उपस्थित होते.

कुलगुरु डॉ. फडणवीस पुढे म्हणाल्या की आजच्या काळात पदवी शिवाय ज्या विदयार्थ्यांकडे काही अधिक कौशल्ये आहेत त्यांना रोजगाराची अधिक संधी उपलब्ध होऊ शकते हे लक्षात घेऊन विदयापीठ अनुदान आयोगाने बी. होक. अभ्यासक्रमाची आखणी केली . विदयापीठातील इतर विभागांनीही असे कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरु करावेत.

सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत जे विदयार्थी शिक्षण घेतात त्यातील बरेच विदयार्थी नोकरीसाठी आवश्यक कौशल्याचा अभाव असल्यामुळे नोकरीसाठी पात्र ठरत नाहीत. कौशल्याधारित व विदयार्थी केंद्रित अभ्यासक्रम या त्रुटी दूर करतील अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केली.

प्रारंभी संकुलाचे संचालक डॉ.जी एस कांबळे यांनी संकुलाच्या वतीने प्रास्ताविक करताना सांगितले की, विदयापीठात व सामाजिक शास्त्र संकुलात प्रथमच बी.होक. अभ्यासक्रम सुरू होत आहे. या संकुलाने मागील वर्षभरात एक नवीन पदवी अभ्यासक्रम व चार प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत. शैक्षणिक कामगिरीच्या बाबतीत हे संकुल आघाडीवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

कार्यक्रमाच्या प्रारंभी विभाग प्रमुख डॉ रवींद्र चिंचोलकर यांनी प्रास्ताविक केले. या अभ्यासक्रमास 25 विदयार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. या अभ्यासक्रमाचे वर्ग सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळामध्ये होत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी संकुलाचे संचालक डॉ.जी.एस. कांबळे यांच्या हस्ते कुलगुरूंचा सत्कार करण्यात आला. कुलगुरुंच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच चित्रफित दाखवून या अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी रजनी हुनमोटे आणि वीरेश अक्कलकोटे या दोन विदयार्थ्यांचे कुलगुरूंच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक तेजस्विनी कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. अंबादास भासके यांनी केले.

Related News