News Updates

अँकरिंगचे क्षेत्र आव्हानात्मक – दीपक पळसुले

सोलापूर – निवेदनाचे क्षेत्र हे आव्हानात्मक क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्यांनी आपली बौद्धिक क्षमता प्रयत्नपूर्वक वाढविणे आणि परिश्रमाची तयारी ठेवणे मात्र गरजेचे आहे असे मत ए.बी.पी. माझाचे अँकर दीपक पळसुले यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या ‘अँकरिंग’ या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन 20 जुलै 2019 रोजी दुपारी 11.30 वाजता संपन्न झाले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.मृणालिनी फडणवीस होत्या. याप्रसंगी मंचावर सामाजिक शास्रे संकुलाचे संचालक प्रा. जी एस कांबळे, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश व्हनखडे कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर. ए.बी.पी माझाचे सोलापूर प्रतिनिधी आफताब शेख यांच्यासह सामाजिक शास्त्रे संकुलातील तसेच भाषा अध्यापक आणि अँकरिंग अभ्यासक्रमाचे विदयार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना दीपक पळसुले म्हणाले की, अँकरिंग ओठातून यावे लागते. कोणता शब्द कसा उच्चारावा याचा सराव करावा लागतो. चांगले वाचन, श्रवण याबरोबरोबरच संयम हे गुण अंगी बाणवावे लागतात तरच निवेदन लोकांपर्यंत पोहोचते. चांगले निवेदन ऐकण्यासाठी देखील अनेक लोक कार्यक्रमांना येतात. निवेदनासाठी आपला आवाज जपणे हे महत्त्वाचे असते. त्यासाठी आवाजाचे काही व्यायाम नियमितपणे करावेत असे देखील त्यांनी सांगितले.

अँकरिंग क्षेत्रांमधील आपले अनुभव सांगताना पळसुले म्हणाले की कधी - कधी खूप कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. याची अनेक उदाहरणे देत ते म्हणाले अशा  संकटाच्या प्रसंगी जर अँकर अष्टावधानी असेल तरच त्याचा निभाव लागतो. त्यामुळे सर्व विषयांचे थोडे ज्ञान अँकरला असणे गरजेचे असते. तसेच वेळप्रसंगी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्याच्या अंगी असावी लागते.

 याप्रसंगी बोलताना कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, विदयार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले कौशल्य जोपासले व फुलविले पाहिजे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या एका विदयार्थ्याने चांगले बोलता येण्यासाठी अँकरिंगचा अभ्यासक्रम केला, त्यातून आलेल्या संभाषण कौशल्यामुळे त्याला याहूमध्ये मोठी नोकरी मिळाली अशी अनेक उदाहरणे आहेत. आपली भाषा आणि गुणवत्ता या दोनच बाबी आपले भविष्य घडवू शकतात असेही त्या म्हणाल्या.

 कार्यक्रमाची सुरुवात कुलगुरूंच्या हस्ते अँकरिंग अभ्यासक्रमाचे तसेच विदयापीठाच्या युटयूब चॅनेलचे चित्रफित दाखवून उदघाटन करुन करण्यात आली. नितीन शिंदे यांनी ही चित्रफित तयार केली होती.मास कम्युनिकेशन विभाग प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी अँकरिंग अभ्यासक्रम सुरु करण्यामागची भूमिका विशद केली. सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा .डॉ. जी. एस. कांबळे यांनी सांगितले की, सामाजिक शास्त्र संकुल हे विविध उपक्रम राबविण्यात आणि विदयार्थ्यांसाठी विविध योजना आखण्यात अग्रेसर आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँकरिंग अभ्यासक्रमाच्या समन्वयक तेजस्विनी कांबळे यांनी केले. डॉ.अंबादास भासके यांनी आभार मानले.

Related News