News Updates

सामाजिक शास्त्रे संकुलाचे भवितव्य उज्ज्वल

सोलापूर –  सामाजिक शास्त्रे संकुलाने मागील दहा वर्षात चांगली कामगिरी केली आहे, यापुढेही खूप महत्वपूर्ण कामगिरी करावयाची आहे. आजच्या काळात आंतर विदयाशाखीय संशोधनाला व  त्यामुळे सामाजिक शास्त्रे संकुलाला अधिक महत्व आले आहे. त्यामुळे संकुलाचा भविष्यकाळ उज्ज्वल राहील , त्यासाठी माजी विदयार्थीही चांगले योगदान देऊ शकतील असे मत कुलगुरु प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाच्या दशकपूर्ती सोहळ्याचा समारोप शनिवार दिनांक 27 एप्रिल 2019 रोजी सकाळी 11 वाजता माजी विदयार्थ्यांच्या मेळाव्याने झाला. विदयापीठाच्या मुख्य सभागृहात झालेल्या या मेळाव्यात कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस अध्यक्षपदावरुन बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर संकुलाचे संचालक प्रा.डॉ. जी.एस. कांबळे, पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील, जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश व्हनकडे, डॉ. प्रभाकर कोळेकर होते.

कुलगुरु डॉ. फडणवीस पुढे म्हणाल्या की , इतर सर्व विदयाशाखांइतकीच सामाजिक शास्त्रे शाखाही महत्वाची आहे. या संकुलात अनेक महत्वपूर्ण अभ्यासक्रम व प्रकल्प विदयापीठ सुरु करीत आहे. या  संकुलाच्या प्रगतीत माजी विदयार्थी अनेक प्रकारे योगदान देऊ शकतात. यात वेगळ्या विषयावर एखादे व्याख्यान देणे, हस्तलिखिते तयार करणे, इ कटेंट तयार करणे, संशोधन प्रकल्प हाती घेणे इत्यादींचा उल्लेख त्यांनी केला.

संकुलाचे संचालक प्रा.डॉ. जी.एस. कांबळे म्हणाले की, संकुलाने अध्यापन, संशोधन, सामाजिक उपक्रम यात भरीव कामगिरी केली आहे. यापुढच्या काळात अभ्यासक्रमांची , विविध मान्यवर संस्थांसमवेत सामंजस्य कराराची संख्या वाढविण्यावर भर आहे. फिनलँडमधील तुर्कू विदयापीठासमवेत ‘शाश्वत विकास’ अभ्यासक्रमासाठी करार केला आहे, जून 2019 मध्ये याबाबत तुर्कू विदयापीठात चर्चा करण्यास कुलगुरु, संचालक आणि काही अध्यापक जाणार आहेत.

 याप्रसंगी डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी प्रास्ताविक केले . डॉ. माया पाटील , डॉ. रवींद्र चिंचोलकर, डॉ. प्रकाश व्हनकडे यांनी आपल्या विभागाच्या कार्याची माहिती दिली. ‘विदयावार्ता’ या जनसंज्ञापन विभागाच्या दशकपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन यावेळी कुलगुरु डॉ. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

 

याप्रसंगी संकुलाच्या माजी विदयार्थी विदयार्थी संघटनेची कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी संकुलाचे संचालक डॉ जी.एस. कांबळे पदसिध्द अध्यक्ष आहेत. इतर

पदाधिका-यात संघटनेच्या उपाध्यक्षपदी विजय जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. याचबरोबर सचिवपदी ज्ञानेश्वर राऊत ,तर खजिनदारपदी सुनील पिस्के यांची निवड झाली. सदस्य म्हणून सीमा इंगवले, डॉ.रतन वाघमारे,अक्षता मदहल्ली, बापू इंगळे आणि समाधान भोरकडे यांची निवड करण्यात आली.

मेळाव्यात विदयापीठ अधिसभा सदस्य सिद्धाराम पाटील, गणेश सातालोलु, डॉ. रविराज गायकवाड बापू इंगळे, संकेत कुलकर्णी, सीमा इंगवले, डॉ. परमेश्‍वर होनराव आदींनी मनोगत व्यक्त करत आपल्या संकुल व विभागाबाबत मते व्यक्त केली. सिध्दारामपाटील यांनी विश्वकोषाच्या कामात विदयापीठाची मदत घेऊ असे सांगितले डॉ. होनराव यांनी संकुलाला संसोधन पध्दती याविषयावरील ग्रंथ खरेदीस पाच हजार रुपयांची देणगी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. अंबादास भासके यांनी मानले. कार्यक्रमास माजी विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

Related News