News Updates

माध्यमांच्या क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा अधिक अवघड – जत्राटकर

सोलापूर - माध्यमांचा आवाका फार मोठा आहे, तसेच माध्यमांचा संबंध हा समाजाशी असतो, त्यामुळे या विषयाच्या नेट-सेट परीक्षेचा अभ्यास करताना अनेक मुद्दे विचारात घेऊन तयारी करावी लागेल असे मत शिवाजी विदयापीठातील जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागातर्फे दिनांक 22 व 23 मार्च 2019 रोजी नेट-सेट मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत श्री. जत्राटकर बोलत होते. या कार्यशाळेत अहमदनगर येथील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. बापू चंदनशिवे तसेच चैतन्य शिनखेडे यांची देखील व्याख्याने झाली.

आलोक जत्राटकर यांनी नेट – सेट परीक्षेची तयारी करताना कोणत्या तंत्राचा अवलंब विद्यार्थ्यांनी करावा याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ.बापू चंदनशिवे यांनी चित्रपट, माहितीपट या अनुषंगाने नेट - सेट परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच या परीक्षेच्या तयारीसाठी माध्यम संशोधन या विषयाकडे विशेष लक्ष कसे दयावे यासंदर्भातही मार्गदर्शन केले.

चैतन्य शिनखेडे यांनी मास कम्युनिकेशन मधील विविध सिद्धांतांच्या संदर्भात तपशिलाने माहिती दिली. ते पुढे म्हणाले की नेट परीक्षेत प्रामुख्याने माध्यम सिद्धांतांवर जास्त प्रश्न विचारले जातात त्यामुळे या विषयाची तयारी विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख डॉ रवींद्र चिंचोलकर यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. डॉ. अंबादास भासके यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या अतिथींचा परिचय करून दिला तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related News