News Updates

नेट-सेट परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवत यश संपादन करा

सोलापूर- विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी नेट-सेटकार्यशाळाही उपयुक्त आहे. नेट-सेट परीक्षेत केवळ उत्तीर्ण होण्याकडे लक्ष देण्यापेक्षा सर्वाधिक गुण मिळविण्यासाठी प्रयत्न करा. त्यातून फार मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतील, असे मत पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. एस. आय. पाटील यांनी व्यक्त केले.

विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाच्यावतीने दि. 22 आणि 23 मार्च 2019 रोजी नेट-सेट परीक्षेसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्र कुलगुरू डॉ. पाटील हे बोलत  होते. यावेळीमंचावर या संकुलाचे संचालक डॉ. जी. एस. कांबळे, पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ,प्रकाश व्हनकडे आदी होते.

आपल्या भाषणात पुढे बोलताना प्र कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले की, सामाजिकशास्त्र ही अतिशय महत्त्वाची विद्याशाखा आहे. सामाजिक क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला एकाच प्रकारे गृहीत धरून निष्कर्ष काढता येत नाहीत, त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील अभ्यास आणि संशोधन हे अधिक कठीण आहे .सामाजिकशास्त्रांच्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करणे, विचारमंथन करणे या गोष्टींवर भर द्यायला हवा. विचारमंथनातून त्यांची विचारसरणी अधिक प्रगल्भ होत जाईल व त्यामुळे त्यांना आपले निर्णय स्वतः घेण्याची व चांगले संशोधन करण्याची क्षमता निर्माण होईल, असा विश्वास डॉ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संचालक डॉ. जी.एस.कांबळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, सामाजिक शास्त्रे संकुल हे अतिशय चांगल्या रीतीने कामगिरी करत आहे. या संकुलातील संशोधकांनी मागील चार वर्षात सहा संशोधन प्रकल्प मिळविले आहेत, त्यातील तीन प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

यावेळी रुसामार्फत संशोधन प्रकल्पासाठी अनुदान मिळाल्याबाबत डॉ. माया पाटील यांचा तर आय.सी.एस.एस.आर. ( इम्प्रेस) प्रकल्पांतर्गत संशोधन प्रकल्पास अनुदान मंजूर झाल्याबद्दल डॉ. रवींद्र चिंचोलकर यांचा प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अंबादासभासके यांनी आभार प्रदर्शन केले.   

उद्घाटन समारंभानंतर अर्थशास्त्र, पुरातत्वशास्त्र तसेच मासकम्युनिकेशन या तीन विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे नेट-सेट मार्गदर्शन कार्यशाळेला प्रारंभ झाला. याप्रसंगी डॉ. प्रकाश व्हनखडे यांच्यासह अध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यशाळेत 23 मार्च 2019रोजी मास कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी आलोक जत्राटकर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. बापूचंदनशिवे, अहमदनगर, चैतन्य शिनखेडे यांची व्याख्याने होणार आहेत

Related News