News Updates

समाज व ग्रामविकासाशी निगडीत संशोधनास प्रोत्साहन देऊ : तावडे

सोलापूर- संशोधकांनी समाज आणि ग्रामविकासाशी निगडीत विषय संशोधनासाठी निवडावेत. सोलापूर जिल्ह्यात अशा प्रकारचे किमान 15 हजार विषय असून अशा विषयांवर संशोधन केल्यास उच्च शिक्षण विभाग त्यासाठी प्रोत्साहन देईल, असे मत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

       शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 रोजी सोलापूर विद्यापीठात हातमाग प्रकल्पाचे आणि  482 एकर परिसर व कृषी पर्यटन केंद्राच्या संरक्षक भिंतीचे भूमिपूजन शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. बी. घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

          मंत्री तावडे म्हणाले की, पंढरपूरच्या वारीचे व्यवस्थापन या विषयावर संशोधनाला मोठा वाव आहे. अशा प्रकारचे संशोधनाचे विषय असायला हवेत. संशोधकांनी पगारवाढीसाठी संशोधन करण्यापेक्षा समाजाला उपयोगी ठरेल, अशा प्रकारचे संशोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले. सोलापूर विद्यापीठाला राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे इनक्युबेशन सेंटर मंजूर केले आहे. त्याकडे विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प सादर करावेत. सोलापूर विद्यापीठाला नामांकित विद्यापीठ म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी या विद्यापीठाने उद्योग क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क करून नवनवीन प्रयोग सुरु करावेत. या माध्यमातून उद्योगवाढीसाठी उपयोगी अशा प्रकारचे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाने स्वतःहून समाजाला उपयोगी पडणारे काही अभ्यासक्रम सुरू करावेत तसेच विदेशातील विद्यापीठांशी संपर्क करून त्यांच्याशी करार करून काही अभ्यासक्रम सुरू करावेत आणि आपल्या विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घालावी, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र शासनाने नवा विद्यापीठ कायदा आणला आहे. त्यामध्ये अभ्यास मंडळात विद्यार्थी प्रतिनिधीना सहभाग दिला आहे. विद्यार्थ्यांच्या अपेक्षा या अभ्यासक्रमातून पूर्ण व्हाव्यात. यामध्ये  ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल, या दृष्टीने आपल्या अभ्यासक्रमात बदल करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची गरज ओळखून आणि त्याची कौशल्य ओळखून अभ्यासक्रम सुरू केले जावेत, अशी अपेक्षा श्री. तावडे यांनी व्यक्त केली.

        भारत हा तरुणांचा देश आहे आणि या देशात महत्त्वाचे संशोधन झाल्यास अब्दुल कलाम यांनी भारताचे स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न पूर्ण होऊ शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, प्रत्येकाने जर कोणत्याही कामासाठी पैसे देणार नाही असा निर्धार केला तर भ्रष्टाचार कमी होईल. आम्ही शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पोर्टल सुरू केले अशी माहिती देऊन त्यानी, आपल्या देशातील संविधानाला अभिप्रेत असणारा प्रामाणिक नागरिक शिक्षणातून घडावा अशी अपेक्षा व्यक्त केली.आपल्या देशाच्या रक्षणासाठी सैनिक प्राणांची बाजी पणाला लावतात याचे उदाहरणही मंत्री तावडे यांनी दिले.

 

         याप्रसंगी श्री तावडे यांनी शिक्षणमंत्री श्री तावडे यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना दिलखुलासपणे आणि सविस्तर उत्तरे दिली. विद्यार्थ्यांशी केलेल्या या संवादामुळे विद्यार्थी देखील आनंदून गेले आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री आमच्यापर्यंत येऊन थेट आमच्याशी संवाद साधत आहेत, ही आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे, अशी भावना यावेळी व्यक्त केली. यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील प्रतिष्ठित नागरिक देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

हातमाग प्रकल्प, कृषी पर्यटन केंद्राचे कौतुक

सोलापूर विद्यापीठाकडून सुरू करण्यात येणाऱ्या हातमाग प्रकल्पाची माहिती जाणून घेऊन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्याचबरोबर विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या कृषी पर्यटन  केंद्र आणि अभ्यासक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी या प्रकल्पाची माहिती मंत्री महोदयांना दिली.

Related News