News Updates

भारतीय स्वातंत्र्यलढा या विषयावर विकिपीडियावरील संपादन अभियान

सोलापूर - मराठी विकिपीडिया समुदाय आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी च्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यलढा या विषयावर संपादन अभियान राबविण्यात आले. या अभियानात सोलापूर विदयापीठातील मास कम्युनिकेशन विभागाच्या विदयार्थ्यांनी  ज्ञान निर्मितीत भरीव योगदान दिले आहे.

दिनांक १० ते २० ऑगस्ट २०१८ या कालावधीत मराठी विकिपीडिया समुदाय आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी भारतीय स्वातंत्र्यलढा या विषयावर संपादन अभियान राबविले .सदर अभियानात भारतातील अनेक भाषा समुदाय त्या त्या विकिपीडियामध्ये एकाच वेळी सहभागी झाले. यात भारतीय स्वातंत्र्यलढा याविषयीच्या माहितीत लेखांची भर घालणे, लेख सुधारणे इत्यादी बाबी करावयाच्या होत्या. विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात  केल्या जाणा-या लेखनात जास्तीत जास्त व्यक्तींनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते.

या अभियानात  सोलापूर विदयापीठातील मास कम्युनिकेशन विभागाच्या अरविंद बगले, ऋतुराज स्वामी, विजय थोरात, अनोज कदम , वृंदा काळे, स्वप्निल सोनवणे, सागर सुतार, प्रमोद हिप्परगी, रघुनाथ पवार, रुपेश हेळवे, रुपेशकुमार  किरसावळगी, विजयालक्ष्मी चोरगी, गौरी जोग, प्रसाद कानडे ,  अमोल साबळे, शीतल पवार,  सिध्दप्पा तुगीवडीयार , लक्ष्मण सरवदे इत्यादी विदयार्थ्यांचा सहभाग होता.

सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी सोलापूर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाला या अभियानाची माहिती देऊन, यात माहिती व लेख कसे लिहावेत याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले.  सोलापूर विदयापीठातील  सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ.जी.एस. कांबळे  यांनीही या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.  मास कम्युानिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, सहायक प्राध्यापक अंबादास भासके व तेजस्विनी कांबळे यांनीही या अभियानात सहभाग घेतला.

 या अभियानात 20 अध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन  सोलापूरचे हुतात्मा शंकर शिवदारे, जगन्नाथ शिंदे, मल्लप्प्पा धनशेट्टी, किसन सारडा, कुर्बान हुसेन यांच्याबाबतीत लेखन केले. तसेच स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील सोलापूर जिल्हयातील  कल्पतरु, समाचार यासह विविध वृत्तपत्रे तसेच त्या काळातील महाराष्ट्रातील  वृत्तपत्रे आणि स्वातंत्र्यलढा या विषयावरील माहिती व लेख लिहिले. काही लेखांचे संपादन करुन , त्यातील माहितीत नवी भर घातली.

Related News