News Updates

चांगल्या आरोग्यासाठी आहाराकडे लक्ष द्या: डॉ. काळेले

सोलापूर- धकाधकीच्या युगात चांगल्या आरोग्यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. निरामय आयुष्य जगण्यासाठी पोषक आहाराची गरज असल्याचे प्रतिपादन नागपूर येथील महिला महाविद्यालयातील डॉ. मीना काळेले यांनी केले.

मंगळवारी, सोलापूर विद्यापीठात आहारातून आरोग्य याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. काळेले बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी नागपूरच्या आहार समुपदेशक डॉ. मनाली काणे, वित्त व लेखाधिकारी डॉ. बालाजी शेवाळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. धवल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रम आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला.

डॉ. काळेले आरोग्यासाठी संतुलित आहार या विषयी मार्गदर्शन करताना म्हणाल्या, सुंदर आयुष्य जगण्यासाठी लहानपणापासूनच आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आहाराचा दर्जा याकडे ही तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे. केमिकलयुक्त अन्नाचा वापर टाळून नैसर्गिक अन्नाचा आहारात वापर करावा. ताजी फळे, ताज्या भाज्या यांचा नेहमी आहारात समावेश असावा. सात्विक आहार हे आरोग्यासाठी नेहमी उत्तम असते, असेही डॉ. काळेले या म्हणाल्या. डाळीत चांगले प्रथिने असतात, त्यामुळे दररोजच्या आहारात डाळी, दूध, दही यांचा समावेश करावा.

डॉ. काणे यांनी आजारपण व आहार या विषयी मार्गदर्शन करताना म्हणाल्या, अति तिथे माती या उक्तीप्रमाणे कोणतेही गोष्ट अति प्रमाणात केल्यास त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. सध्या जीवनशैली बदलली आहे. जंक फूड, फास्ट फूडचा जमाना चालू आहे. त्यामुळे तरुणपिढी आहाराविषयी जागरूक असणे आवश्यक आहे. सकस आहार घेतले तरच चांगले आरोग्य राहणार आहे. आहाराबरोबरच व्यायामही निरोगी आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे. याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल केली तर त्याचा आरोग्यासाठी फायदा होतो, असे डॉ. काणे म्हणाल्या. यावेळी त्यांनी शरीरातील पाण्याविषयी ही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला विद्यापीठ संकुलातील संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले तर आभार उपकुलसचिव अर्चना चोपडे यांनी मानले.

 

स्कूल ऑफ हेल्थ सायन्स सुरू करणार 

आरोग्य आणि शिक्षण या विकासाच्या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. यासाठीच सोलापूर विद्यापीठ आरोग्यविषयक कार्यक्रम तसेच ॲक्युप्रेशर यासारख्या कार्यशाळांचे आयोजन करीत आहे. आता विद्यापीठाकडून स्कूल ऑफ हेल्थ सायन्स सुरू केले जाणार आहे. या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे त्यास सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे. लवकरच विद्यापीठात स्कूल ऑफ हेल्थ सायन्स संकुल सुरू होईल, याबरोबरच नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाबरोबर सोलापूर विद्यापीठ   सामंजस्य करार केल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी दिली.

 

Related News