News Updates

समाजोपयोगी संशोधनाला सोलापूर विदयापीठाचे प्राधान्य

सोलापूर – सोलापूर विदयापीठात समाजोपयोगी संशोधन करण्यावर भर दिला जात असून , अशा संशोधन प्रकल्पातून विदयार्थ्यांमध्ये विश्लेषक दृष्टी निर्माण होऊ शकेल. तसेच शासन आणि समाज यात सेतू निर्माण करण्याचे महत्वपूर्ण कार्यही यातून घडू शकेल असे मत कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.

सोलापूर विदयापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलात 14 ऑगस्ट 2018 रोजी विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन करताना त्या बोलत होत्या. यप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी प्रा. डॉ. अंजली कुलकर्णी ( नागपूर ) , प्रा. डॉ. पुष्पा इंदूरकर (पुणे) , सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. प्रकाश व्हनकडे यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेस डॉ. माया पाटील, डॉ. प्रभाकर कोळेकर, सहायक प्राध्यापक ज्ञानेश्वरी हजारे, स्नेहल नष्टे,  रमेश गाढवे, अमोल गजधाने, प्रियांका चिप्पा,  साळूंखे आदी अध्यापकांसह विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना कुलगुरु डॉ.फडणवीस म्हणाल्या की, आजच्या काळात जगात  सर्वत्र आंतरविदयाशाखीय संशोधनाला अधिक महत्व दिले जात आहे. त्या अनुषंगाने सोलापूर विदयापीठातही आंतरविदयाशाखीय संसोधन प्रकल्प हाती घेतले जात आहेत. सामाजिक शास्त्रे संकुलाने उजनी धरणाच्या पाण्यासंदर्भात भूशास्त्र व्‍ रसायनशास्त्र संकुलाच्या मदतीने हाती घेतलेला संसोधन प्रकल्प यादृष्टीने महत्वाचा आहे. मानव विकास निर्देशांकाच्या संदर्भात  तर सर्व विषयांच्या विदयार्थ्यात दरवर्षी चर्चा होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

 प्रमुख अतिथी डॉ.अंजली कुलकर्णी  व डॉ. पुष्पा इंदूरकर यांनी संशोधकांचे सादरीकरण झाल्यानंतर प्रत्येक संशोधकाला महत्वपूर्ण सूचना दिल्या. डॉ. अंजली कुलकर्णी  यांनी संशोधनात कोणत्या पध्द्तींचा अवलंब करावा, त्यासाठी माहिती व आकडेवारी कशी मिळवावी, विश्लेषण कसे करावे हे उदाहरणांसह सांगितले. डॉ. पुष्पा इंदूरकर यांनी मानवी गरजांसाठी जे पर्यावरणाचे नुकसान होते, ते भरुन काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना करुन पर्यावरणाचे संतुलन राखणे शक्य होईल ते सांगितले.

प्रारंभी डॉ. जी.एस. कांबळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की सामाजिक शास्त्रे संकुलाचे हे दशकपूर्तीचे वर्ष असून त्यानिमित्त विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. ही कार्यशाळा हा त्यातील तिसरा उपक्रम आहे. या कार्यशाळेत उजनीतील पाणी, मानव विकास निर्देशांक, पिकाची आधारभूत किंमत , प्लास्टिकबंदी या समाजाशी निगडित विषयांवर सादरीकरण केले जात आहे.

या कार्यशाळेत उजनीतील पाण्याबाबतच्या संशोधन प्रकल्पाबाबत सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. जी.एस.कांबळे, भूशास्त्र संकुलाचे डॉ. विनायक धुळप, रसायनशास्त्र संकुलाचे डॉ. मुकुंद माळी यांनी संयुक्तरित्या सादरीकरण केले. या प्रकल्पाचे संशोधन एका वर्षाच्या कालावधित पूर्ण होईल , त्यावेळी विविध उपाययोजना सुचविल्या जातील असे त्यांनी स्पष्ट केले.  

मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी प्लास्टिक बंदीबाबत केलेल्या सर्वेक्षणातील महत्वाच्या बाबी सादरीकरणातून मांडल्या.  पिकाच्या आधारभूत किमतीबाबत विश्वनाथ कांबळे, अक्षदा मधाली, नेहा पुजारी, प्रियांका गळवे, डॉ. प्रकाश व्हनकडे , डॉ. रमेश गाढवे आदींनी सादरीकरण केले. मानव विकास निर्देशांकाबाबत डॉ. रुपेश पवार, तेजस्विनी कांबळे,  डॉ. अमोल गजधाने यांनी सादरीकरण केले.

प्रारंभी डॉ. प्रकाश व्हनकडे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करुन दिला. तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अंबादास भासके यांनी आभार मानले.

 

Related News