News Updates

 विविध सामाजिक प्रश्नांबाबत  सोलापूर विदयापीठात कार्यशाळा

सोलापूर – सोलापूर विदयापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलात 14 ऑगस्ट 2018 रोजी विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत पिकांसाठीची आधारभूत किंमत , मानव विकास अहवाल, उजनीतील पाण्याची समस्या तसेच प्लास्टिकबंदी या विषयांवर विदयार्थी व शिक्षक सादरीकरण करणार आहेत. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. अंजली कुलकर्णी ( नागपूर ) , प्रा. डॉ. पुष्पा इंदूरकर (पुणे) यांची उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांची उपस्थिती लाभणार आहे.

सरकारतर्फे पिकांसाठी दिल्या जाणा-या आधारभूत किमतीच्या अनुषंगाने यात सादरीकरण होणार आहे. यात प्रामुख्याने सोलापूर जिल्हयातील शेतक-यांसाठी महत्वाच्या असलेल्या ‘ ज्वारी ‘ पिकाबाबत आधारभूत किमतीचा भविष्यात काय परिणाम होणार आहे यावर चर्चा होणार आहे. मानव विकास अहवालात समाविष्ट असणा-या बाबी तसेच शैक्षणिक पार्श्वभूमी याबाबतही सादरीकरण होणार आहे. या सादरीकरणात भारताचा , महाराष्ट्राचा तसेच सोलापूर जिल्हयाच्या मानव विकास अहवालातील महत्वाच्या बाबींवर चर्चा होणार आहे.

उजनी धरण हे सोलापूर जिल्हयासाठी जीवनादायिनी मानले जाते. या धरणातील पाण्याबा प्रदूषण, कीटकनाशके, जंतू इत्यादी कारणांमुळे  पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण होतात. यासंबंधीही या कार्यशाळेत सादरीकरण व चर्चा होणार आहे. याशिवाय प्लास्टीक बंदीसंदर्भात राज्य शासनाने घातलेल्या बंदीनंतरच्या स्थितीचा अभ्यास या कार्यशाळेत मांडला जाणार आहे. या कार्यशाळेचा लाभ विदयार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन समाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे यांनी केले आहे.

Related News