News Updates

सोलापूर विद्यापीठाचा वर्धापन दिन संपन्न

सोलापूर- सोलापूर विद्यापीठाचा 14 वा वर्धापन दिन बुधवार दि. 1 ऑगस्ट, 2018 रोजी संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी सोलापूरच्या महापौर श्रीमती शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन झाले तसेच ॲग्रोटुरिजमसाठी निवडलेल्या जागेत वृक्षारोपन करण्यात आले. या समारंभात प्रा. पुरणचंद्र पुंजाल यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व इतर महत्वपूर्ण पुरस्कारांचे वितरण झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. याप्रंसंगी मंचावर प्रा. पुरणचंद्र पुंजाल, कुलसचिव डॉ. गणेश मंझा, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. व्ही. बी. पाटील, परीक्षा व मुल्यमापन विभागाचे संचालक, बी. पी. पाटील तसेच वित्त व लेखा अधिकारी डॉ. बी. सी. शेवाळे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना प्रमुख अथिती श्रीमती शोभा बनशेट्टी म्हणाल्या की, सोलापूर विद्यापीठ प्रगतीच्या मार्गावर जोमदार वाटचाल करत असून स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने सोलापूर विद्यापीठाची प्रगती व विद्यापीठाने हाती घेतलेले संशोधन प्रकल्प उपयुक्त आहेत. सोलापूर विद्यापीठाला महापालिकेकडून आवश्यक असणारे सर्व सहकार्य आम्ही करु. सोलापूरात कन्नड व तेलगु भाषिकांची संख्या मोठी आहे, त्या विद्यार्थ्यांसाठीही विद्यापीठाने रोजगाराभिमूख अभ्यासक्रम सुरु करावेत. त्यासाठी विद्यापीठ महानगरपालिका आवश्यक ती मदत करायला तयार आहे.

देशात अनेक क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा चांगले कर्तृत्व गाजवित असून पंतप्रधानांनी या संदर्भात देशभरातील महापौरांच्या परिषदेत गौरवोदगार काढले. असे सांगून महापौर श्रीमती शोभा बनशेट्टी म्हणाल्या की, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु पदाची धुरा ही कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस समर्थपणे संभाळत आहेत.

जीवन गौरव पुरस्कार प्राप्त प्रा. पुरणचंद्र पुंजाळ या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, विद्यापीठाने दिलेल्या या पुरस्कारामुळे मी भारावलो आहे. मला क्रिडा क्षेत्राच्या विकासासाठी आयुष्यभर संघर्ष करावा लागला. मात्र या संघर्षामुळेच 1994 च्या विद्यापीठ कायद्यात काही तरतूदी होऊन क्रिडा शिक्षकांच्या व क्रिडा क्षेत्राच्या काही अडचणी कमी झाल्या. 2016 च्या विद्यापीठ कायद्याने तर क्रिडा शिक्षकांना व क्रिडा क्षेत्राला जे आवश्यक हेाते ते सारे काही दिले आहे. सोलापूर विद्यापीठानेही 482 एकरातील विकास आराखड्यात क्रिडा संकुलासाठी चांगली योजना आखली आहे. ती योजना प्रत्यक्षात यावी व त्यासाठी रुसा मार्फत तसेच विविध उद्योगांमार्फत निधी दिला जावा.

ऑलिंपिक स्पर्धेत भारताला कमी पदके मिळतात तेव्हा देशभरातून ओरड होते. मात्र शालेय स्तरापासून क्रिडा विकासाकडे चांगले लक्ष द्यायला हवे, हे विसरले जाते. देशात क्रिडा संस्कृती निर्माण होण्याची खरी गरज आहे. तामिळनाडू राज्यातील देशातील पहिले क्रिडा विद्यापीठ झाले. तसा विचार महाराष्ट्रातही केला जाण्याची गरज आहे, असे मत प्रा. पुंजाल यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस आपल्या भाषणात म्हणाल्या की, विद्यापीठाने प्रशासकीय इमारतीच्या प्रलंबित कामाला गती दिलेली असून यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच आर्किटेक्ट वराडे बंधू यांचे चांगले सहकार्य लाभले. विद्यापीठाचा आराखडा बर्कले या जागतिक स्तरावर नावजलेल्या विद्यापीठाची आठवण येईल इतका चांगला झाला आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

विद्यापीठाने सेल्फ डिफेन्स, व्हॅल्यु एज्युकेशन यासाठी सामंजस्य करार केला असून कदाचित देशातील या प्रकाराचा हा पहिलाच करार असेल. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. रोजगार निर्मितीला पुरक असणारे ॲग्रो टुरिजम, ॲक्युप्रेशर यासारखे अभ्यासक्रम देखील सुरु करत आहोत, असे सांगून कुलगुरु डॉ. फडणवीस पुढे असे म्हणाल्या की, विद्यापीठाने स्थानिक गरजांवर आधारित संशोधनाला अधिक प्राधान्य दिले आहे. परीक्षा विभागाने महत्वपूर्ण काम केले असून प्राचार्यांसाठी नव्याने एक ॲप विकसित केले आहे. विद्यापीठ प्रत्येक संकुलात एक इन्क्युबेशन सेंटर सुरु करण्याचा विचार करत असून त्यामुळे नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे विद्यार्थी घडतील अशी अपेक्षा आहे. विद्यापीठाने पंढरपूर वारीच्या काळात हरित वारीसाठी चांगले प्रयत्न केले यात विविध महाविद्यालयांनी त्यातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी, तसेच रा.से.यो. स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचे कुलगुरुंनी कौतुक केले.

कार्यक्रमाची सुरुवात शाहिर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाली. याप्रसंगी कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या मागील एक वर्षातील कामकाजाचा आढावा सादर केला. त्यात विद्यापीठाचे डिजिटाजेशन, रुसाद्वारे सुरु असलेला स्मार्ट सिटीचा प्रकल्प इत्यादींचा प्रामुख्याने उल्लेख केला.

सकाळी 11:30 वाजता विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन प्रमुख अथितींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ॲग्रो टुरिजम प्रकल्पाच्या ठिकाणी वृक्षारोपान करण्यात आले. व्यासपीठावरील कार्यक्रमास विद्यापीठ गीताने सुरुवात झाली. यात प्रा. पुरणचंद्र पुंजाल यांना जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पुंजाल यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. याप्रसंगी उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार (ग्रामीण) श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शीच्या वतीने प्राचार्य थोरात यांनी स्विकारला. उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार (शहरी) लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब सांळुखे यांनी स्विकारला. यावेळी उत्कृष्ट प्राचार्य (ग्रामीण) डॉ. कैलास जगन्नाथ करांडे, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी तसेच उत्कृष्ट प्राचार्य (शहरी) डॉ. महिबूब अ. माजीद दलाल, सोशल महाविद्यालय, सोलापूर यांनाही सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक (ग्रामीण) पुरस्कार डॉ. विकास लक्ष्मण कदम, के. बी. पी. महाविद्यालय, पंढरपूर यांनी स्विकारला तर महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक (शहरी) पुरस्कार डॉ. सचिन रतिकांस गेंगजे, वालचंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी स्विकारला. गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार संगवे अजितकुमार बापूराव, वालचंद महाविद्यालय यांना देण्यात आला. सोलापूर विद्यापीठाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रा. विकास बाबुराव पाटील, पदार्थ विज्ञान संकुल, सोलापूर विद्यापीठ यांनी स्विकारला. याशिवाय गुणवंत पाल्य व शैक्षणिक अर्हतेत वाढ झालेल्या कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. प्रभाकर कोळेकर व सहायक प्राध्यापक तेजस्वीनी कांबळे यांनी केले. विद्यापीठाचे विशेष कार्यासन अधिकारी डॉ. व्ही. बी. पाटील यांनी आभार मानले. या समारंभासाठी विद्यार्थी, नागरिक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राचार्य, संस्था चालक, व्यवस्थापन परिषद सदस्य व विद्यापीठ अधिकार मंडळांचे सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related News