News Updates

सोलापूर विदयापीठामुळे चांगले कार्य करण्याची संधी मिळाली सत्काराला उत्तर देताना बी.पी.पाटील  यांचे उदगार

सोलापूर- सोलापूर विदयापीठामुळे खूप चांगले काम करण्याची संधी मिळाली. सामूहिक प्रयत्नांव्दारे परीक्षा विभागाच्या कामकाजात महत्वपूर्ण बदल घडविता आले. यापुढच्या काळात इतर विदयापीठांनी सोलापूर विदयापीठ पॅटर्न राबवावा असे काम यापुढेही व्हावे असे भावपूर्ण उदगार विदयापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक बी.पी.पाटील यांनी काढले.

आपला चार वर्षाचा कार्यकाळ संपवून उत्तर महाराष्ट्र विदयापीठ , जळगाव येथील मूळ पदावर बी.पी.पाटील परत जात आहेत. त्यामुळे  त्यांना निरोप देण्यासाठी सोलापूर विदयापीठातर्फे आयोजित समारंभात झालेल्या सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. याप्रसंगी मंचावर कुलसचिव डॉ. जी.आर. मंझा, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. व्ही.बी. पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. बालाजी शेवाळे, डॉ. सौ. स्मिता पाटील यांची उपस्थिती होती.

 या विद्यापीठातील सर्व घटकांचे भरपूर प्रेम लाभले , त्याची आठवण आपणास सदैव राहील असे सांगून बी.पी. पाटील म्हणाले की , जळगावला विद्यापीठात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून मी कामाला सुरुवात केली होती. पण नवीन काही शिकत राहण्याच्या वृत्तीमुळे मी या पदापर्यंत पोहोचू शकलो.

याप्रसंगी बी.पी. पाटील यांच्या पत्नी डॉ. स्मिता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या समर्पित भावनेने विदयापीठाची सेवा करणे हाच माझ्या पतीचा स्वभाव आहे. त्यांच्या या कार्यामुळेच येथे  झालेला हा सत्कार आम्हाला आनंददायी वाटतो.

 अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, परीक्षा विभागाचे कामकाज करताना बी.पी.पाटील यांनी ज्या पध्दतीने डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करुन चांगले बदल घडविला, तसा प्रगतीचा विचार प्रत्येक विभागाने करावा. परीक्षा विभागाला यापुढव्या काळात उत्तरपत्रिकांचे ऑनलाईन मूल्यमापन,  क्वेश्चन बँक, पदवी प्रथमवर्ष परीक्षेचे मूल्यमापन महाविद्यालयाकडून करणे इत्यादी कामे करायची आहेत. परीक्षा विभागाला आणि विदयापीठाला पुढे नेण्याचे काम आपणाला करायचे आहे.

 या कार्यक्रमात प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य आबासाहीब देशमुख, प्राचार्य बी.पी.रोंगे,प्राचार्य एन.बी.पवार, प्राचार्य आर. वाय.पाटील, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे,  सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, यंत्रणा विश्लेषक प्रशांत चोरमले, उपकुलसचिव मलिक रोकडे, सतीश नारकर इत्यादींनी भाषणे केली. परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक बी.पी.पाटील यांनी  मागील चार वर्षात परीक्षा विभागात महत्वपूर्ण बदल घडविले, त्यांची कार्यतत्परता, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती आणि विदयार्थीकेंदी निर्णय यामुळे या विभागाला पुढे नेले असे मनोगत सर्वांनी व्यक्त केले.

 प्रारंभी कुलसचिव जी.आर. मंझा यांनी प्रास्ताविकात सांगितले की परीक्षा विषयक कामगिरीत सोलापूर विदयापीठ महाराष्ट्रात तिस-या क्रमांकावर आहे हीच पाटील यांच्या कार्याची पावती आहे.  कुलगुरुंच्या हस्ते बी.पी.पाटील व त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सोमनाथ सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विदयार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध संकुलांचे संचालक , व्यवस्थापन परिषदेचे सदस्य , अधिकार मंडळांचे सदस्य उपस्थित होते.

Related News