News Updates

1 ऑगस्ट रोजी सोलापूर विद्यापीठाचा वर्धापन दिन

स्सोलापूर-  सोलापूर विद्यापीठाचा 14 वा वर्धापन दिन बुधवार दि. 1 ऑगस्ट, 2018 रोजी संपन्न होत असून या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. विनोद तावडे, सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री ना. विजयकुमार देशमुख, महाराष्ट्राचे सहकार मंत्री ना. सुभाष देशमुख, सोलापूरच्या महापौर श्रीमती शोबा बनशेट्टी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस राहणार आहेत.

याप्रसंगी प्रा. पुरणचंद्र पुंजाल यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून इतरही महत्वपूर्ण पुरस्कारांचे वितरण होणार आहे. विद्यापीठाच्या प्रस्तावित प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजनही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.

01 ऑगस्ट, 2018 रोजी सोलापूर विद्यापीठाच्या स्थापनेला 14 वर्षे पूर्ण होत असून विद्यापीठ 15 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. या निमित्ताने या दिवशी सकाळी 10 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुंरुच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे आरोहन करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यापीठाच्या 482 एकर जागेमध्ये नवीन प्रस्तावित प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी 11:30 पासून विद्यापीठाच्या दीक्षांत सभामंडपात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.

जीवन गौरव पुरस्कार:  

            विद्यापीठातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार देण्यात येवून सन्मानित करण्यात येते. यावेळी हा पुरस्कार प्रा. पुरणचंद्र पांडूरंग पुंजाल यांना जाहीर झाला आहे. प्रा. पुंजाल यांनी शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, सहकार व बँकिंग यासारख्या क्षेत्रात केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  

        प्रा. पुंजाल यांनी सोलापूर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील खेळाडू घडविण्यासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे. विशेषत: बास्केट बॉल व जलतरण या क्रिडा प्रकारांसाठी त्यांनी केलेले कार्य अनमोल आहे. त्यांनी अखिल भारतीय शारीरिक संघटनेचे अध्यक्ष, सोलापूर जिल्हा क्रीडा संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पातळीवर असलेल्या हॅडबॉल आणि बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष, तर पश्चिम भारत फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्य केलेले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे सेक्रेटरी, पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, सोलापूर मुन्सिपल कार्पोरेशनचे नगराध्यक्ष, म.न.पा. सोलापूरचे महापौर म्हणून पूर्वी काम केले. महाराष्ट्र शासनाने त्यांना “शिव छत्रपती” (1986-87) आणि ‘आदर्श शिक्षक’ (1999-2000) हे दोन पुरस्कार दिले. शिवाजी विद्यापीठानेही ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

 

इतर पुरस्कार:

या वर्धापन दिन कार्यक्रमात पुढील पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार (ग्रामीण) श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी, तर उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार (शहरी) लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर यांना दिला जाणार आहे. उत्कृष्ट प्राचार्य (ग्रामीण) पुरस्कार हा डॉ. कैलास जगन्नाथ करांडे, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी यांना तर उत्कृष्ट प्राचार्य (शहरी) पुरस्कार डॉ. महिबूब अ. माजीद दलाल, सोशल महाविद्यालय, सोलापूर यांना दिला जाणार आहे. महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक (ग्रामीण) पुरस्कार डॉ. विकास लक्ष्मण कदम, के. बी. पी. महाविद्यालय, पंढरपूर यांना तर महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक (शहरी) पुरस्कार डॉ. सचिन रतिकांस गेंगजे, वालचंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी यांना देण्यात येणार आहे. गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कारात महाविद्यालयीन स्तरावर संगवे अजितकुमार बापूराव, वालचंद महाविद्यालय यांना दिला जाणार आहे. सोलापूर विद्यापीठाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रा. विकास बाबुराव पाटील, पदार्थ विज्ञान संकुल, सोलापूर विद्यापीठ यांना जाहीर झालेला आहे.

            याशिवाय गुणवंत पाल्य व शैक्षणिक अर्हतेत वाढ झालेल्या कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

            सोलापूर विद्यापीठाने वर्धापन दिन समारंभाच्या यशस्वीतेसाठी विविध समिती गठित केल्या असून समारंभाची तयारी केली आहे. या समारंभासाठी विद्यार्थी, नागरिक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राचार्य, संस्था चालक, विद्यापीठ अधिकार मंडळांचे सदस्य आदींनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी केले आहे.

Related News