News Updates

मानवी जीवनाचा खरा इतिहास जाणून घेण्यास पुरातत्वशास्त्र उपयुक्त

सोलापूर – प्राचीन काळातील सर्वसामान्य्‍ माणसांचा खरा मानवी इतिहास जाणून घेण्यासाठी उत्खनन हे महत्वाचे साधन आहे. महाराष्ट्रात झालेल्या उत्खननातून दख्खन भागातील मानवी जीवनाचा खरा इतिहास जाणून घेणे शक्य झाले आहे. यातून खूप काही शिकता येईल असे मत डेक्कन कॉलेज अभिमत विदयापीठाचे कुलगुरु प्रा. वसंत शिंदे यांनी व्यक्त केले. सोलापूर विदयापीठातील इतिहास व पुरातत्वशास्त्र विभाग आणि सोसायटी ऑफ साऊथ एशियन आर्किओलॉजी ( सोसा) यांच्या संयुक्त विदयमाने ‘दक्षिण पठारावरील पुरातत्वशास्त्र’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्राचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राच्या पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे होते. मंचावर , भारतीय पुरातत्व संस्थेचे ए. सुंदर, विदयापीठाचे विशेष कार्यासन अधिकारी प्रा. व्ही.बी.पाटील्‍, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्रा. इ.एन. अशोककुमार, इतिहास व पुरातत्वशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी कुलगुरु प्रा. शिंदे पुढे म्हणाले की , 1950 पासून दख्खन पठारावरील पुरातत्वाच्या अभ्यासाला गती मिळाली. प्रा. सांकलीया यांनी सुरुवात केली. त्यानंतर नेवासा, जुन्नर, इनामगाव आदी ठिकाणी झालेल्या संशोधनातून सातवाहन, कुशान , गुप्त कालखंडातील मानवी जीवनाच्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे. राजेरजवाडयांच्या नव्हे तर सामान्य माणसाचे जीवन कसे होते, त्या काळातील संस्कृती, आर्थिक स्थिती, खानपानाच्या सवयी इत्यादी बाबींचा यातून अभ्यास करता आला. कुशान कालखंडातील सामान्याचे जीवन अधिक समृध्द होते असे आढळून आले आहे.या अभ्यासात नवी तंत्रेही अवलंबिली आहेत . प्रा. ए. सुंदर म्हणाले की , ग्रामीण भागातील मंदिरांच्या अभ्यासातूनही खूप काही साध्य करने शक्यआहे. ग्रामीण भागातील मंदिराची वास्तुकला, त्यातील शिल्प, त्याचा इतिहास स्थानिक लोकांनाही ठाऊक नसतो. पुरातत्वशास्त्राच्या तरुण अभ्यासकांनी याची माहिती मिळवून ती त्या मंदिंरांसमोर प्रदर्शित केले तर, महत्वाचे कार्य घडू शकेल. अध्यक्षीय भाषणात डॉ. तेजस गर्गे म्हणाले की, आजच्या काळात माणसाला परसपरापासून तोडण्याचे प्रकार होत आहेत्‍. पुरातत्वशास्त्र माणूस इथून – तिथून एकच आहे हे सांगून समस्त मानवजातीला जोडणारे शास्त्र आहे. सोलापूर विदयापीठाचा पुरातत्वशास्त्र विभाग उत्खनन आणि संशोधनाचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे. यातीन संशोधकांची नवी पीढी निर्माण होईल. डॉ. तेजस गर्गे यांनी मध्ययुगीन काळाचा आढावा घेताना युध्दसाठी आवस्यक असणा-या तोफा कशा निर्माण झाल्या, त्यासाठी कोणत्या धातूंचा वापर होत होता याचे विस्तृत विवेचन केले. प्रा. व्ही.बी. पाटील म्हणाले की, पुरातत्वशास्त्र विभागाने आयोजित केलेले हे चचा॒सत्र महत्वपूर्ण आहे. प्रा. इ.एन. अशोककुमार म्हणाले की , जगभरात प्राचीन मानवी जीवनाच्या संदर्भात जागोजागी जे पुरावे मिळाले , त्यात बरेच साम्य आहे. डॉ. माया पाटील म्हणाल्या की , हे चर्चासत्र आयोजित करण्यामागचा उद्देश पुरातत्वशास्त्रातील संशोधक व अभ्यासकांना एकत्र आणणे तसेच पुढील संशोधनाला चालना देणे हा आहे. सकाळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन चर्चासत्राचे उदघाटन झाले. दिवसभरात या चर्चासत्रात, प्रा. सुषमा देव, डॉ. कांती पवार, डॉ. विराग सोनटक्के, डॅ. प्रमोद दंडवते, डॉ. श्रीकांत जाधव, डॉ. रवी जाधव, डॉ. विजय साठे, डॉ. माया पाटील, डॉ. प्रभाकर कोळेकर आदींनी शोधनिबंध सादर केले. तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गौतम कांबळे, डॉ. प्रकाश व्हनकडे, प्रा. ज्ञानेश्वरी हजारे यांनी स्वागत केले. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी आभार मानले.

Related News