News Updates

लोकशाही अधिक बळकट करण्याची गरज – प्रा. महेश माने

सोलापूर – भारतीय राज्यघटना जगातली सर्वश्रेष्ठ राज्यघटना असून त्या आधारेच आपल्या लोकशाहीची वाटचाल सुरु आहे. ही लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सजग राहून कार्य करावे लागेल. यासाठी सर्वांनी मतदान करणे, सुशासनाची कास धरणे याची गरज आहे असे मत सोलापूर विदयापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने यांनी व्यक्त केले. सोलापूर विदयापीठात लोकशाही पंधरवाडयाचे उदघाटक म्हणून प्रा. माने बोलत होते. याप्रसंगी त्यांचे ‘लोकशाही , निवडणुका आणि सुशासन’ या विषयावर व्याख्यान झाले.अध्यक्षस्थानी विदयापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक मलिक रोकडे होते. मंचावर कुलसचिव डॉ. जी.आर. मंझा, विशेष कार्यासन अधिकारी प्रा. व्ही.बी.पाटील, अधिसभा सदस्या अश्विनी चव्हाण आदी मान्यवर होते. आपल्या भाषणात पुढे बोलताना प्रा. महेश माने म्हणाले की, लोकशाही याचा अर्थ लोकांची सत्ता असा आहे.भारतीय घटनेने जनतेला देशाचा मालक संबोधले आहे.लोकप्रतिनिधी, मंत्री हे खरे तर जनतेचे सेवक आहेत. प्रत्यक्षात परिस्थिती नेमकी उलट आहे. मालक असलेली जनता आपले अधिकार विसरली आहे. एकदा निवडून गेले की, अनेक लोकप्रतिनिधी जनतेला भेटतही नाहीत आणि कामेही करीत नाहीत. कामे न करणा-या लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याची स्वित्झर्लंडसारखी तरतूद भारतात नाही , त्यामुळे त्यांचे फावते. दुस-या बाजूला शहरातील उच्चशिक्षित लोक तर मतदानच करीत नाहीत, अशाने लोकशाही बळकट कशी होणार. आपल्या देशात राजकीय लोकशाही आहे. मात्र सामाजिक लोकशाही अजून प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही अशी खंत व्यक्त करुन प्रा. माने म्हणाले की, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही घटनेची त्रिसूत्री आहे. या अनुषंगाने अनेकांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांची पूर्तता करण्यासाठी फार मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य बजावण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे सुशासन अमलात आणण्यासाठी खूप प्रयत्नांची गरज आहे. अध्यक्षीय भाषणात मलिक रोकडे यांनी सांगितले की प्रत्येक लोकशाहीसाठी निवडणुका आणि सुशासन यांची कार्यवाही आणखी चांगल्या रितीने होण्याची गरज आहे.कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. जी.एस.कांबळे यांनी प्रास्ताविक केले, ते म्हणाले की, लोकशाही पंधरवाडयानिमित्त सोलापूर विदयापीठात आनि संलग्न महाविदयालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2018 या कालावधीत करण्यात आले आहे. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला , सहायक कुलसचिव शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध संकुलांचे संचालक , अध्यापक, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी तसेच विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Related News