News Updates

लोकांच्या जीवनाशी निगडित विषय अभ्यासक्रमात समाविष्ट असावे

सोलापूर- जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या महत्वाच्या विषयांचा समावेश अभ्यासक्रमात होणे आवश्यकच, यादृष्टीने सोलापूर विदयापीठाने ‘लोकशाही , निवडणुका आणि सुशासन’ या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश केला याचा आनंद होतो असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केले.

सोलापूर येथील डी.बी.एफ.दयानंद महाविदयालयात ‘ लोकशाही, निवडणुका आणि सुशासन या विषयावर ते बोलत होते. यावेळी मंचावर रवींद्र मोकाशी, प्राचार्य व्ही.पी. उबाळे, प्राचार्य क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार वागळे पुढे म्हणाले की, लोक खूप शिकतात , मात्र शिक्षणातून मिळालेली जीवनमूल्ये प्रत्यक्ष जीवनात उपयोगात आणत नाहीत अशा प्रकारच्या जगण्याला काही अर्थ नाही. भारतीय घटना तयार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील विविध देशांच्या महत्वाच्या घटनांचा अभ्यास केला होता. त्यानंतर तयार केलेली भारतीय घटना हे आपल्या देशाचे महत्वाचे बलस्थान आहे. ही घटना मूलतः समतावादी,धर्मनिरपेक्ष आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतीय घटना विचारात घेऊन त्यांच्या देशाची घटना तयार केली आहे. भारताला पुढे न्यायचे असेल तर घटनेने सांगितलेल्या दिशेनेच देशाची प्रगती झाली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 लोकशाहीत नागरिकांच्या भूमिकेला विशेष महत्व असल्याचे सांगून पत्रकार वागळे म्हणाले की, नागरिकांनी जागरुक राहून प्रश्न विचारले पाहिजेत.भारतीय घटनेने सर्वच नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य  बहाल केले आहे. या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करुन आपली लोकशाही बळकट केली पाहिजे.

 प्रारंभी प्राचार्य डॉ.उबाळे यांनी वागळे यांचे स्वागत केले. कार्यक्रमास विदयार्थी, अध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Related News