News Updates

27 सप्टेंबरपासून किर्लोस्कर – वसुंधरा पर्यावरण चित्रपट महोत्सव

 सोलापूर - सोलापूर शहरात दिनांक 27 ते 30 सप्टेंबर 2018 दरम्यान किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने माहितीपट स्पर्धा, पथनाटय स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच नाटय स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीचे मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख प्रभाकर रावळ , डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, डॉ. नरेंद्र काटीकर , सुभेदार पेठकर , डॉ. रवींद्र चिंचोलकर, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीचे ऋषिकेश कुलकर्णी उपस्थित होते.

या पत्रकार सांगण्यात आले की , किर्लोस्कर वसुंधरा हा चार दिवस चालणारा महोत्सव मागील दहा वर्षापासून सोलापूर शहरात साजरा होतो आहे. या महोत्सवात पर्यावरणाच्या संदर्भातील महत्वपूर्ण चित्रपट  दाखविले जातात तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात पर्यावरण, वनजीवन ,ऊर्जा, हवा आणि पाणी या संदर्भातील उपक्रमांचे आयोजन केले जाते.

 यावर्षीच्या या महोत्सवाचा मुख्य विषय आहे ‘प्रदूषण टाळा आणि नदी वाचवा’. भारतीय संस्कृतीत नदीला जीवनदायिनी म्हटलेले आहे. नदीच्या काठी अनेक संस्कृती रुजल्या आणि वाढल्या आहेत. पण आजच्या आधुनिक काळात भौतिक विकासाच्या मागे लागून मानवाने या नद्यांचे शोषण केले आहे. त्यामुळे नद्या कोरड्या पडत चालल्या आहेत. यावर उपाय म्हणून शासन आणि नागरिकांच्या प्रयत्नातून काही ठिकाणी नदीला पुनरुज्जीवित करण्याचे प्रयोग झाले व ते यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. हेच कदाचित आपल्या भविष्याचे उत्तर आहे.

या महोत्सवाच्या अंतर्गत होणाऱ्या सर्व स्पर्धांसाठी ‘प्रदूषण टाळा नदी वाचवा’ हा विषय निवडण्यात आलेला आहे .या महोत्सवाच्या अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये माहितीपट व लघुपट चित्रपट स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव आणि पत्रकारिता विभाग सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. ही स्पर्धा महाविद्यालयातील व विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या स्पर्धेसाठी 22 सप्टेंबर 2018 पर्यंत प्रवेशिका पाठवता येतील असे संयोजकांनी कळविले आहे. या स्पर्धेसाठी दहा मिनिटाची लघुपट अथवा माहितीपट तयार करणे अपेक्षित आहे. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार रुपये तीन हजार रुपये दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. या संदर्भातील अधिक माहितीसाठी पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर  ( 9860091855) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 त्याचप्रमाणे या महोत्सवाच्या निमित्ताने पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ही पथनाट्य स्पर्धा दयानंद महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दिनांक 27 सप्टेंबर 2018 रोजी दयानंद महाविद्यालय मुक्तांगण येथे होणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व  संपर्कासाठी डॉ. वीरभद्र दंडे ( 9423820574) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

 त्याचप्रमाणे प्रश्नमंजुषा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रश्नमंजुषा स्पर्धा महाविद्यालयीन व विदयापीठातील विद्यार्थ्यांसाठी आहे. ही स्पर्धा 28 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी दहा वाजता मंगळवेढेकर मॅनेजमेंट इन्स्टिटयूट येथे होणार आहे. सोलापूर विद्यापीठातील पर्यावरण विभागाच्या सहयोगाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे नियम व अटी व माहितीसाठी  सोलापूर विद्यापीठाच्या पर्यावरण विभागातील डॉ. विनायक धुळप ( 7588384576) यांच्याशी संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

 या महोत्सवांतर्गत सातवी ते नववी या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांसाठी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .या स्पर्धेचे आयोजन किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव व सिद्धेश्वर हायस्कूल यांच्या सहयोगाने करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक 28 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी एक वाजता सिद्धेश्वर हायस्कूल, सिद्धेश्वर पेठ येथे होणार आहे. त्यातील विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम दिली जाणार आहेत याचा अधिक माहितीसाठी सौ. ज्ञानेश्वरी टकले ( 9112891972) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related News