News Updates

नेट-सेट कार्यशाळेचा उपक्रम चांगले शिक्षक घडविण्यास उपयुक्त – डॉ. निशा पवार

सोलापूर – शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होण्याच्या उद्देशाने सोलापूर विदयापीठाने नेट-सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळांचा जो उपक्रम हाती घेतला आहे तो अत्यंत उपयुक्त आणि महत्वपूर्ण आहे, यातून चांगले शिक्षक व संशोधक घडतील असे मत डॉ. निशा पवार , विभागप्रमुख, मास कम्युनिकेशन विभाग, शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी व्यक्त केले. सोलापूर विदयापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात नेट- सेट परीक्षेची तयारी करु इच्छिणा-या मास कम्युनिकेशन विदयार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेचे उदघाटन्‍ करताना डॉ.पवार बोलत होत्या. मंचावर विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिचोलकर, प्रा. अंबादास भासके, प्रा. मधुकर जक्कन, प्रा. चैतन्य शिनखेडे, प्रा. तेजस्विनी कांबळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. निशा पवार यांनी आंतरराष्ट्रीय संवादाच्या क्षेत्रात कसे बदल घडत गेले आहेत याची सविस्तर माहिती दिली. आंतरराष्ट्रीय संवादात बराचकाळ पाश्चिमात्य देश आणि त्यांच्या वृत्तसंस्था यांचे प्राबल्य होते. मात्र आता जागतिकीकरण आणि इंटरनेटमुळे माहितीचे प्रवाह मुक्त आणि खुले झाल्याने परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे विकसनशील देशांच्या विकासालाही अधिक चालना मिळाली आहे असेही त्या म्हणाल्या. संगमेश्वर महाविदयालयातील प्रा. चैतन्य शिनखेडे यांनी विकासासाठी संवाद कसा महत्वाचा आहे आणि विकासाच्या प्रक्रीयेत माध्यमे कशी महत्वपूर्ण भूमिका करु शकतात ते सांगितले. प्रा. बाळासाहेब मागाडे यांनी मुद्रण तंत्रज्ञानात झालेल्या बदलांचा आढावा घेत भविष्य काळात वृत्तपत्रांचे स्वरुप कसे बदलू शकते यावर भाष्य केले. प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी संवादाचे शास्त्र कसे विकसित होत गेले हे ते सांगून संवादाच्या महत्वपूर्ण सिध्दांतांची माहिती दिली. नेट- परीक्षेचे व त्यातील प्रश्नांचे स्व्रप कसे असते, परीक्षेला कसे सामोरे जावे याची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली तसेच प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सरावही करुन घेण्यात आला. प्रारंभी विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिचोलकर यांनी सांगितले की विदयापीठातील विशेष मागासवर्ग कक्षातर्फे नेट-सेट परीक्षा देऊ इच्छिणा-या मागासवर्गीय व इतर प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्रारंबी प्रा. अंबादास भासके यांनी परिचय करुन दिला, प्रा. मधुकर जक्कन यांनी आभार मानले.

Related News