News Updates

स्त्री-पुरुष समानता अजून नाहीच, महिला , विदयार्थिनींची खंत

सोलापूर ( दिपाली जाखलेकर, तृप्ती बसुदेपाटील ) - स्त्री-पुरुष समानतेपासून अजून आपण खूप दूर आहोत.  महिलांना चांगली वागणूक देण्याची मानसिकता मात्र हळू हळू निर्माण होत आहे असे मत सोलापूर विदयापीठात शिकणा-या विदयार्थिनी आणि काम करणा-या महिलांनी व्यक्त केले.

 जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला काही विदयार्थिनी आणि महिलांची मते आम्ही जाणून घेतली त्यातून हे मत व्यक्त झाले.

 भेदभाव होतोच- निखिला

निखिला गणपा ही विद्यार्थिनी म्हणाली की, आजही स्री-पुरुषात भेदभाव होताना दिसून येतो. अजूनही अशी अनेक क्षेत्रे आहेत की ज्यात मुलींना करिअर करण्याची संधी दिली जात नाही. मुलींची मानसिकताही काही प्रमाणात करणीभूत आहे. मुलीच मुलींना कमी लेखतात हे चित्र बदलायला हवे.

पालकांचा मुलींना पाठिंबा हवा – रुबीना

शेख रुबीना म्हणाली की , स्री-पुरुष समानता प्रत्यक्षात किती आली ते सांगता येणार नाही . मात्र कुटुंबियांनी मुलींना भक्कम पाठिंबा दिला पाहिजे. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन त्यांना हव्या त्या क्षेत्रात करीअर करण्याची संधी दिली पाहिजे.

महिला आरक्षण नावापुरतेच- स्वप्ना

स्वप्ना कुडलच्या मते महिलांना काही क्षेत्रात पन्नास टक्के आरक्षण दिल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात ते आरक्षण नावापुरतेच असते. सगळा कारभार, सत्ता पुरुष आपल्या हातात ठेवतात. त्यामुळे स्त्रिया मागे आहेत. स्त्री-पुरुष समानता ही अजून खूप दूरची गोष्ट आहे. स्त्रियांना आपली मते मांडण्यास हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले पाहिजे.

महिला आघाडीवर – राणी

राणी घोडसे हिने मात्र सर्व क्षेत्रात महिलाच बाजी मारत आहेत असे ठामपणे सांगितले. विविध परीक्षांमध्ये विद्यार्थिनीच गुणवत्ता यादीत अग्रस्थानी असतात यातून हेच दिसते. त्यामुळे स्री-पुरुष समानतेचे युग आले आहे असे वाटते.

मुलगाच वंशाचा दिवा का – धनश्री

धनश्री बागल म्हणाली की, अजूनही वंशाचा दिवा म्ह्णून मुलगाच हवा असा आग्रह समाजात धरला जातो. मुलीला मात्र परक्याचे धन मामले जाते. त्यामुळे स्री-पुरुष समानतेपासून आपण कोसो दूर आहोत. मुलींना बंधनात जखडले जाते. ग्रामीण भागात तर याचे प्रमाण खूप आहे.

जन्मापासूनच असमानतेची वागणूक- प्रणिता

 प्रणिता ठोंबरे म्हणाली की मुलींना जन्मापासूनच असमानतेची वागणूक मिळते. कुटुंबात मुलांसाठी वेगळे नियम तर मुलींसाठी वेगळे नियम असतात. त्यामुळे मुलींच्या मनात अविश्वासाची भावना निर्माण होते.

महिलांची बरोबरी – स्तुती

सध्या सर्व क्षेत्रात महिला पुरुषांची बरोबरी करताना दिसतात. शैक्षणिक क्षेत्रात तर महिला पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत. स्त्री-पुरुष समानता आकाराला येत आहे.

ग्रामीण स्त्रिया बंधनातच – आम्रपाली

शहरी भागात स्त्रियांच्या हक्कांचा विचार काही प्रमाणात होताना दिसतो, ग्रामीण भागात मात्र महिला खूप बंधनात आहेत. ग्रामीण भागातील अधिकार दिले पाहिजेत . असे झाले तरच भारतीय समाजाचा समतोल विकास होऊ शकेल.

 

Related News