News Updates

तीन वर्षात दोन पदविका आणि एक पदवी मिळण्याची संधी , बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

सोलापूर –  तीन वर्षात दोन पदविका आणि एक पदवी मिळू शकणारा आगळावेगळा पत्रकारिता अभ्यासक्रम  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठात सुरु होत आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येऊ शकेल.

विद्यापीठात सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने ‘बी. होक. पत्रकारिता व जनसंज्ञापन’ हा पदवी  अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहे. विदयापीठ अनुदान आयोगाने हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी या विदयापीठाचा प्रस्ताव स्वीकारुन तसे मान्यतापत्र पाठविले आहे.या अभ्यासक्रमास 8 हजार रुपये शुल्क आहे.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशास सुरुवात झाली असून कोणत्याही विद्याशाखेची बारावी किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण विदयार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे. प्रवेशासाठी प्रथम येणारास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

आजच्या काळात पदवीबरोबर काही कौशल्ये ज्यांच्याकडे असतील त्यांनाच नोकरीची संधी मिळाते. ही गरज लक्षात घेऊन विदयापीठ अनुदान आयोगाने कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम विदयापीठे आणि महाविदयालयात सुरू व्हावेत यासाठी बी. होक. या योजनेअंतर्गत काही अभ्यासक्रमांची निवड केली व त्यासाठी अनुदान देण्यास सुरुवात केली. या योजने अंतर्गत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी देशभरातून अर्ज मागवले होते.  विदयापीठ आयोगाने आलेल्या  प्रस्तावामधून काही निवडक विदयापीठे व महाविदयालयांना अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विदयाशाखेच्या विदयार्थ्यांना प्रवेश घेता येईल. हा अभ्यासक्रम कौशल्य विकासावर आधारित असल्याने हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विदयार्थ्यांना वृत्तपत्रे, रेडिओ, टीव्ही, सिनेमा, ऑनलाईन पत्रकारिता , जनसंपर्क, जाहिरात तसेच शासकीय क्षेत्रात  नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. तसेच या कौशल्यांचा उपयोग करुन स्वतःचा व्यवसाय सुरु करता येईल. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश 5 ऑगस्ट 2019 रोजीपासून सुरु होत आहेत.या अभ्यासक्रमासाठी एका वर्षाचे शुल्क 15 हजार रुपये आहे.

पत्रकारिता आणि जनसंज्ञापन या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विदयार्थ्यांनी या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा असे आवाहन सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ कांबळे यांनी केले आहे. या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी विदयापीठातील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर  ( मो. 9860091855 ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विदयापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.